लोकसभेच्या जागा तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार....डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची हिरवी कंदील
नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने डीलिमिटेशनच्या माध्यमातून महिला आरक्षण लागू करणाऱ्या संविधान दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे देशातील सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होणार असून, ही नवी रचना २०५१ पर्यंत कायम राहणार आहे. आगामी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. आधी हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र कॅबिनेटच्या बैठकीतच त्यावर निर्णय झाल्याने या विधेयकासाठीच हे अधिवेशन बोलावण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या विधेयकावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद तीव्र झाले असून, अनेक पक्षांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. समाजवादी पक्षाने या विधेयकाला विरोध दर्शवला आहे, तर डीएमके आणि बीआरएसने काही अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने हा संविधानावरील हल्ला असल्याची टीका केली आहे. गेल्या सात महिन्यांत देशातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात सामील होणे, टीएमसी खासदारांचे बंड, डीएमकेचे इंडिया आघाडीतून बाहेर पडणे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची संभ्रमावस्थेतील भूमिका या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा नवा राजकीय डाव खेळल्याचे मानले जात आहे. या डावाला कितपत यश मिळते, हे येत्या आठवड्यात लोकसभेतील घडामोडींतून स्पष्ट होईल. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने उद्या शनिवारी सकाळी ११.३० वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत परिसीमन विधेयकाला विरोध करण्याची रणनीती आखली जाणार असून, या बैठकीला कोणते पक्ष हजेरी लावतात आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रतिनिधी उपस्थित राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
