सिंधुदुर्गच्या १२८ ग्रंथालयांचा कायापालट होणार; ८५ लाखांचे आधुनिक साहित्य मिळणार!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाचन संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांना आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज केले जाणार आहे. या ग्रंथालयांना आवश्यक असणारे संगणक सॉफ्टवेअर, टेबल, खुर्च्या आणि इतर भौतिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ८५ लाख रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी मायनिंग फंड आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ठोस ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. या निधीच्या मंजुरीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांच्या विविध समस्या आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघ व प्रशासनाची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी तयार केलेला ८५ लाख रुपयांचा सविस्तर आराखडा प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील अनेक ग्रंथालयांमध्ये मूलभूत भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे मस्के यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्येक ग्रंथालयाच्या नेमक्या गरजेनुसार हा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये अद्ययावत सॉफ्टवेअरसह फर्निचरचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ज्या गावांमध्ये ग्रंथालयांसाठी स्वतंत्र इमारत किंवा जागा उपलब्ध नाही, तेथील प्राथमिक शाळांच्या रिकाम्या वर्गखोल्या ग्रंथालयांच्या कामकाजासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणीही त्यांनी या बैठकीत केली.
konkansamwad 
