कणकवली शहराच्या विकास प्रारूप आराखड्यावर जास्तीत जास्त हरकती नोंदवा....नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन

कणकवली शहराच्या विकास प्रारूप आराखड्यावर जास्तीत जास्त हरकती नोंदवा....नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन

कणकवली

 

    कणकवली शहराचा नवीन विकास प्रारूप आराखडा नगरपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या प्रारूप आराखड्यावर हरकती, आक्षेप घेण्याची मुदत २७ मार्चपर्यंत असून नागरिकांनी वेळेत आपल्या हरकती सिंधुदुर्गनगरी नगररचनाकार कार्यालय, कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, सत्यजित पारकर आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष पारकर म्हणाले की, कणकवली शहराचा प्रारूप विकास आराखडा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून नागरिकांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र या आराखड्यात अनेक बदल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. १९९९ मधील डीपी प्लॅनमधील ५८ आरक्षणांपैकी २९ आरक्षणे कायम ठेवण्यात आली असून २८ आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. काही ठिकाणी ग्रीन झोन हटवून यलो झोन करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी उलट बदल करण्यात आले आहेत. तसेच शहरालगत असलेल्या जानवली व गडनदी परिसरात फ्रंट लाईन टाकण्यात आल्यामुळे नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना बांधकामासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.याशिवाय काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या ६ मीटर असलेले काही रस्ते ८ ते १२ मीटर करण्याचा प्रस्ताव असल्याने रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना स्वतःची जमीन द्यावी लागणार असून त्याचा थेट फटका जमीनमालकांना बसणार असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले.आराखड्यावर आलेल्या हरकतींनंतर काही दिवसांत जनसुनावणी घेण्यात येणार असून ही जनसुनावणी कणकवलीतच आयोजित करावी, अशी मागणी नगरपंचायतीने नगररचना विभागाकडे केली आहे. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शहर व राज्य स्तरावर बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, आराखड्याला शहरवासीयांचा तीव्र विरोध असल्याने हा आराखडा रद्द करावा आणि हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही पारकर यांनी दिली.