महायुतीच्या माध्यमातून लवकरच 'उमेद मॉल'
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच महायुती सरकारच्या माध्यमातून "उमेद मॉल" उभारण्यात येणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील बचत गटांना होईल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे सिंधू सरच प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. दरम्यान जिल्ह्यातील बचत गट सक्षम होण्यासाठी जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सर्वस्वी सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, माजी आमदार अजित गोगटे, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, सदस्य दिपक नारकर, दिपलक्ष्मी पडते, नागेश आईर, रुपेश कानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वेगुर्ला गटविकास अधिकारी व्हि. एम. नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून या सिंधूसरस प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. त्यांनतर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टॉल्सना भेट देत महिलांच्या उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावर्षी कार्यक्रम अधिक प्रभावीपणे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे असंख्य माता-भगिनींना आपली कला
आणि व्यवसाय सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांची ताकद मोठी आहे. त्या अधिक सक्षम झाल्या तर जिल्ह्याचे अर्थकारणही मजबूत होईल. आज एखाद्या बचत गटात ५ कामगार असतील, तर पुढील वर्षी ती संख्या १५ पर्यंत वाढली पाहिजे. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी महिलांना व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच, नुसती उपस्थिती दाखवून न जाता प्रत्येक नागरिकाने येथे खरेदी करावी, हीच खरी महिलांना मदत ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपले ग्रामीण अर्थकारण मजबूत करायचे असेल तर बचतगटांना कसे सक्षम करायला पाहिजे यावर सर्वानी विचार केला पाहिजे. व्यवसाय वाढविण्यासाठी जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सिंधुसरस हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव आहे, असे सांगितले. चुल आणि मुल या मर्यादित परिघातून बाहेर पडून महिला आता उद्योगक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत. सकाळपासून मी स्वतःही अनेक वस्तू खरेदी केल्या असून, नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करून महिलांना हातभार लावावा, असे त्यांनी आवाहन केले.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अशा प्रदर्शनांमुळे महिलांना मोठे व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळते. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रास्ताविकात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, सन २०१६ पासून आतापर्यंत बचत गटांसाठी सुमारे ८५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार बचत गटांमधून सुमारे १ लाख महिला जोडल्या गेल्या असून, या उपक्रमांमुळे आतापर्यंत सुमारे १५ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. पुढील काळात काही बचत गटांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.या सिंधूसरस प्रदर्शनात सुमारे ७५ स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यामध्ये ५९ स्टॉल्स हे बचतगट उत्पादनांचे आहेत. तर १४ स्टॉल्स खाद्य पदार्थांचे आणि २ स्टॉलस बँकांचे आहेत. सर्व स्टॉलधारक महिलांमध्ये या प्रदर्शनाच्या निमित्ताने उत्साह पाहायला मिळाला. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सुद्धा उद्घटनापूर्वी प्रसिद्ध कराओके गायक समीर चराटकर यांनी विविध गीत सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी मानले. उद्घाटन सोहळ्याला महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
konkansamwad 
