भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा...नगरसेविका सायली दुभाषी यांची मागणी
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करून त्यांना आश्रयगृहात बंदिस्त करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.झिरंगवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे श्वान धावून जात आहेत. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सायकलचा पाठलाग करत असल्याने लहान मुलांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून सध्या नागरिकांना जीव मुठीत धरूनच घराबाहेर पडावे लागत आहे. हे भटके कुत्रे केवळ नागरिकांच्या अंगावर धावून जात नसून, परिसरातील इमारती आणि घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी व इतर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून त्यांच्या मालमत्तेचेही नुकसान होत आहे.अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत, अशी माहिती अॅड. सायली दुभाषी यांनी निवेदनातून दिली आहे. या आदेशांचा आधार घेत सावंतवाडी नगरपालिकेने तात्काळ पावले उचलणे गरजेचे असून नगरपालिकेने या परिसरात मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांना पकडावे आणि त्यांची रवानगी योग्य आश्रयगृहात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या गंभीर समस्येवर सावंतवाडी नगरपालिका प्रशासन किती जलद गतीने कारवाई करते, याकडे कोलगाव झिरंगवाडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
