शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली
वेंगुर्ला
आज पहाटे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली. यात केरवाडी येथील राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग यांना वाचवण्यात दुसऱ्या होडीला यश आले आहे.शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी सारंग व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे समुद्रात बुडाले. दरम्यान राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सूरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. केरवाडी येथील मच्छिमार सोसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
konkansamwad 
