राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकरचे यश
सावंतवाडी
येथील युनिटी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडी येथील मुक्ताई अॅकेडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय स्तरावर बाविसावा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नागोवा-मडगाव येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली, ज्यात भारतातील विविध राज्यांतील ३२१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत रॅपिड रेटिंग आणि ब्लिट्झ नॉन-रेटिंग अशा दोन प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. रॅपिड रेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा विजय आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून एकूण साडेसहा गुण मिळवत २२ वा क्रमांक पटकावला. तर ब्लिट्झ नॉन-रेटिंग स्पर्धेतही त्याने सहा विजय आणि एका बरोबरीसह साडेसहा गुण मिळवून १९ वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल बाळकृष्णला रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. बाळकृष्णसोबतच मुक्ताई ॲकेडमीच्या इतर विद्यार्थ्यांनीही या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. १४ वर्षीय पुष्कर केळूसकर याने सहा राऊंड्स जिंकून सहा गुण मिळवले आणि आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ५४ गुणांची लक्षणीय वाढ केली. ९ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने पाच गुण मिळवत आपला प्रभावी खेळ दाखवला, तर १० वर्षीय प्रज्वल नार्वेकर याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना पराभूत करत चार गुणांची कमाई केली. विशेष कौतुक ७ वर्षीय आकाश वाटवे या चिमुकल्याचे होत आहे, ज्याने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत दोन खेळाडूंवर विजय मिळवून दोन गुण पटकावले. या सर्व यशस्वी खेळाडूंना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे मुक्ताई ॲकेडमीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
konkansamwad 
