देवगड पर्यटन विकासाला नवी दिशा.....५ जुलैला शासकीय पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

देवगड पर्यटन विकासाला नवी दिशा.....५ जुलैला शासकीय पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

देवगड 


     कोकणच्या पर्यटन नकाशावर देवगडची ओळख अधिक ठळक करणारा आणि पर्यटनाला नवी चालना देणारा शासकीय पर्यटन केंद्र विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुक्यात पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि आर्थिक विकासालाही मोठी गती मिळणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवार, दि. 5 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडेल.या कार्यक्रमाला लोकसभा सदस्य नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमित उर्फ अनिकेत तटकरे, आमदार निलेश राणे, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याशिवाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.समुद्रकिनारी पर्यटनाला नवी झेप देणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी केले आहे.