सिंधुदुर्गातील १३२३ शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू ; पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर जिल्हा परिषदेची मोहीम

 सिंधुदुर्गातील १३२३ शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू ; पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर जिल्हा परिषदेची मोहीम

सिंधुदुर्गनगरी

 

     विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सुमारे १,३२३ शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ उपस्थित होते.शाळांच्या सर्वंकष मूल्यमापनासाठी शाळा भेट तपासणी सूची तालुकास्तरावर पाठविण्यात आली असून, त्यानुसार प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी शाळांना भेटी देऊन उपलब्ध पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबी आणि शाळांच्या स्थानिक गरजा यांची तपासणी करीत आहेत.या पाहणीमध्ये शाळेची इमारत व तिची स्थिती, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व सौरऊर्जा सुविधा, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा, वाचनालय, क्रीडांगण, संरक्षक भिंत तसेच शाळेकडे ये-जा करण्यासाठी उपलब्ध रस्ता आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या शालेय निकषांनुसार आवश्यक असलेल्या विविध इंडिकेटर्सचीही पडताळणी केली जात आहे.शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणून ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या प्राधान्याने उपलब्ध करून देणे, हा या सर्वंकष मूल्यमापनाचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.