वेंगुर्ला पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरी केली दिवाळी
वेंगुर्ला
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने आज सातेरी मंदिर हॉल, रामघाट येथे “ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौ. नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुनील डुबळे होते. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, डॉ. जयश्री खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत त्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पोलीस सदैव त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी स्वतःची रचना असलेली “पाखरू” ही कविता सादर करून टाळ्यांची दाद मिळवली.
या कार्यक्रमात डॉ. जयश्री खडपकर यांनी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले, तर सावंतवाडी येथील कपिल कांबळे ऑर्केस्ट्राच्या गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दिवाळी गिफ्टही वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो. कॉ. मनोज परुळेकर यांनी केले तर नियोजन पो. कॉ. जयेश सरमळकर यांनी पाहिले.
ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरी केलेली ही दिवाळी वेंगुर्ला पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण ठरली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

konkansamwad 
