तुळस येथे २७ डिसेंबरला चित्रकला व रंगभरण स्पर्धा.....अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम; पाच गटांत आयोजन

तुळस येथे २७ डिसेंबरला चित्रकला व रंगभरण स्पर्धा.....अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम; पाच गटांत आयोजन

वेंगुर्ला


       विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे,     त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि चित्रकलेची आवड जोपासली जावी, या हेतूने वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने २७ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सकाळी ९ वाजता श्री रामेश्वर मंदिर, तुळस येथे ही स्पर्धा होणार आहे.बालवाडी, पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी-सातवी आणि आठवी-दहावी अशा पाच गटांत स्पर्धा होईल. बालवाडी आणि पहिली-दुसरी या गटांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. चित्रकला स्पर्धेसाठी तिसरी-चौथी गटाला ‘मंदिर’, पाचवी-सातवी गटाला ‘माझ्या गावाची जत्रा’ आणि आठवी-दहावी गटाला ‘कोकणचा मच्छीमार’ हे विषय देण्यात आले आहेत. या विषयांच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कोकणच्या जीवनशैलीचे चित्रण विद्यार्थ्यांना करता येणार आहे.रंगभरण तसेच तिसरी-चौथी गटातील स्पर्धकांनी तेलरंग अथवा स्केच पेनचा वापर करायचा आहे. पाचवी ते दहावी गटासाठी जलरंगाचा वापर बंधनकारक आहे. सर्व गटांसाठी चित्रकलेचा कागद आयोजकांकडून उपलब्ध करून दिला जाईल. स्पर्धकांनी शालेय ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. रंगसंगती, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाणार आहे.रंगभरणाच्या दोन्ही गटांसह तिसरी-चौथी गटासाठी प्रथम ५५५ रुपये, द्वितीय ४४४ रुपये, तृतीय ३३३ रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी २२२ रुपये अशी बक्षिसे आहेत. पाचवी-सातवी आणि आठवी-दहावी गटांसाठी अनुक्रमे प्रथम ७७७ रुपये, द्वितीय ६६६ रुपये, तृतीय ५५५ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ४४४ रुपये आणि उत्तेजनार्थ द्वितीय ३३३ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सागर सावंत (९१५८४५४५९५) यांच्याशी संपर्क साधावा.