जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पोलीस ठाण्यात 'महिला पोलीस ठाणे'
सावंतवाडी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आज 'महिला पोलीस ठाणे' ही संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी म्हणून या पोलीस ठाण्याचा पूर्ण कार्यभार सांभाळला. केवळ प्रभारी अधिकारीच नव्हे, तर ट्रॅफिक, ११२ हेल्पलाईन, ठाणे अंमलदार, वायरलेस विभाग, चेकपोस्ट आणि चालक अशा सर्वच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला पोलिसांनी चोखपणे बजावल्या.या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी नवोदय विद्यालयातील सुमारे २०० किशोरवयीन मुलींनी पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी नलिनी शिंदे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून मुलींशी संवाद साधला आणि महिलांच्या शक्ती व कर्तृत्वाचे पैलू उलगडून दाखवले.यावेळी श्री. दहीकर म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठीच ही 'महिला पोलीस ठाणे' संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनीही महिलांच्या अहोरात्र सेवेचे कौतुक केले. या सोहळ्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी मुलींचा गौरव करण्यात आला, तसेच मुलींना स्वसंरक्षण आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.पोलीस ठाण्याच्या प्रांगणात काढलेली आकर्षक रांगोळी आणि सेल्फी पॉईंट सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. अनेक नागरिक आणि विद्यार्थिनींनी येथे सेल्फी काढून या अनोख्या अनुभवाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती दुधवडकर यांनी केले, तर पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या माधुरी मुळीक यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले.

konkansamwad 
