मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती.....निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती.....निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

मालवण

 

    आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न सुटला असून, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशाने येथे दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे आणि बालरोग तज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे मालवण परिसरातील आरोग्य यंत्रणेला मोठी बळकटी मिळणार आहे.मालवण शहरात दरवर्षी १० लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक जनतेला आणि पर्यटकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आमदार निलेश राणे यांनी नुकतीच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला. तसेच, मालवण ग्रामीण रुग्णालयाची सद्यस्थिती मांडत, या रुग्णालयाला 'उपजिल्हा रुग्णालय' म्हणून दर्जा देऊन आवश्यक सुविधा देण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करत डॉ. वैशाली चव्हाण (बालरोग तज्ज्ञ) व डॉ. प्रशांत बागडे (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांची मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती केली आहे.जनतेला अधिकाधिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील आहेत. त्यांच्या याच पाठपुराव्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांचे शिवसेना मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे यांनी मालवणच्या जनतेच्या वतीने विशेष आभार मानले आहेत.