शेतकऱ्याने चक्क पंपाच्या पाण्याने शिंपली शेती
कणकवली
जून महिन्याची २१ तारीख उजाडली तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढवले आहे. पावसाअभावी रोपवाटिका तसेच अन्य पिकांच्या लागवडीची कामे खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी रोपवाटिकांतील भात रोपे कोमेजू नयेत म्हणून शेतकऱ्यांना चक्क पंपाच्या पाण्याने शेती शिंपण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त खर्च करून पाणीपुरवठा करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी शेतीची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंता कायम आहे. लवकरात लवकर दमदार पाऊस पडून खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
konkansamwad 
