मेढा-मालवण येथील श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न होणार
मालवण
मालवणमधील मेढा येथील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मंगलमयी निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, भक्तीमय भजन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उत्सवाच्या प्रारंभी सकाळी धार्मिक विधींना सुरुवात होईल, ज्यामध्ये 'त्रिशक्ती याग होम हवन' हा मुख्य विधी पार पडणार आहे. सायंकाळच्या सत्रात भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (कांदळगाव देऊळवाडी) आपली कला सादर करतील. बुवा राजेंद्र दिनकर कोदे यांच्या भजनाला बंटी कांदळगावकर (मृदंग) आणि दत्ताराम डिंकावलकर (तबला) यांची साथ लाभणार आहे. रात्रीच्या सत्रात शंकर मंदिर मेढा मालवण महिला मंडळ प्रस्तुत 'रंगमेळा' हा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांचे मनोरंजन करेल. सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ पार पडेल. त्यानंतर 'अष्टपैलू कलानिकेतन' यांच्या वतीने भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामध्ये गायक सुनील परुळेकर आपली कला सादर करतील. या उत्सवाची सांगता कोकणची लोककला असलेल्या दशावतारी नाटकाने होईल. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ (म्हापण, वेंगुर्ला) हे आपले पौराणिक दशावतारी नाटक सादर करणार आहेत.
konkansamwad 
