वेंगुर्ले नगरपरिषदेच्या १५०व्या वर्षानिमित्त २० ते २२ मे दरम्यान भव्य सांस्कृतिक महोत्सव.....२४ ते २६ मे ला मराठी चित्रपट महोत्सव
वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त 20, 21 व 22 मे रोजी शहरात भव्य "सांस्कृतिक महोत्सव"चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 24, 25 व 26 मे या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे 'मराठी चित्रपट महोत्सवा'चे आयोजन केले आहे. अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी न.प. विशेष सभेत दिली.महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालय विभागामार्फत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार दि. 20 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.वेंगुर्ला नगरपरिषदची विशेष सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.वेंगुर्ला नगरपरिषदेला 150 वर्षांचा इतिहास आहे. यानिमित्त दाभोली नाका ते नगरपरिषद स्टेडियम पर्यंत भव्य शोभायात्रा, चित्ररथ स्पर्धा, कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, संयुक्त दशावतार, स्थानिक कलाकारांचे लोककला कार्यक्रम व नामवंत गायकांचा आर्केस्ट्रा होणार आहे.महोत्सवादरम्यान जिल्हाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचा सत्कार होणार आहे. तसेच '150 वर्षाचा वेंगुर्ला चा इतिहास' या विशेष पुस्तकाचे प्रकाशन व डॉक्युमेंटरीचे सादरीकरण होईल, असे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले. 24 ते 26 मे दरम्यान मधुसूदन कालेलकर सभागृहात 8 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांचे मोफत सादरीकरण होणार आहे. 4 कमिट्यांमार्फत चित्रपटांची निवड केली जाणार आहे.
वेंगुर्ला कॅम्प येथील क्रिडांगण नगरपरिषदेकडेच देण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व आमदार दीपक केसरकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निश्चित झाले असून 30 वर्षांचा भाडेकरार केला जाणार आहे. जिल्हा क्रीडा केंद्रासाठीही जागा निश्चित झाली आहे.नाम फाउंडेशन शहरातील संपूर्ण ओहोळाचा गाळ काढणार आहे. शिवाजी प्रागतिक शाळेच्या बांधकामाबाबत निर्लेखनाची फी भरल्यानंतर रीतसर परवानगी दिली जाईल, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
konkansamwad 
