पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात अवैध वृक्षतोड करण्यास बंदी; वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात अवैध वृक्षतोड करण्यास बंदी; वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन

 

दोडामार्ग



      पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५ गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र अर्थात ESA मध्ये समावेश करण्यात आला आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये या भागातील वृक्षतोड व पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी आता सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.सावंतवाडी तालुक्यातील असनिये, पडवे-माजगाव, भालावळ, तांबोळे, सरमळे, दाभिळ, ओटवणे, कोनास, धारपी, उडेली, केसरी व फणसवडे तसेच दोडामार्ग तालुक्यातील कुंभ्रल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली व फुकेरी या गावांचा या संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे.या टास्क फोर्सचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी असून सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक सावंतवाडी आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांचा समितीत समावेश आहे. टास्क फोर्सची मासिक बैठक घेऊन वृक्षतोडीवरील प्रतिबंधात्मक कारवाई, पर्यावरण संरक्षण उपाययोजना आणि प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे.दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही गावात खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील, वनरक्षक किंवा तलाठी यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करतील.प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७, महाराष्ट्र झाडे तोडण्याबत विनियमन अधिनियम १९६४ आणि महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६७ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वृक्षतोडीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.