केकेआर-पंजाब लढत पावसामुळे रद्द दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएलमधील सोमवारचा सामना मुसळधार पाऊस व ओलसर आऊटफील्डमुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. केकेआरने याद्वारे गुणांचे खाते खोलले आहे.नाणेफेक जिंकून केकेआरने फलंदाजी स्वीकारली. पण चौथ्या षटकावेळी पावसास सुरुवात झाली आणि त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. केकेआरने यावेळी संघर्ष करीत ३.४ षटकांत २ बाद २५ धावा जमविल्या होत्या. सामना सुरू होण्यासाठी ११.१५ ही कटऑफ वेळ होती. पण यानंतरही खेळ सुरू होऊ न शकल्याने पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली.पंजाबलाही एक गुण मिळाल्याने गुणतक्त्यात ते आघाडीवर पोहोचले आहे. तीन सामन्यातून त्यांचे५ गुण झाले आहेत. केकेआरला एक गुण मिळाल्याने ते आता आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांचेही तीन सामने झाले असून दोन सामन्यात ते पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे याच दोन संघांत मागील वर्षी येथे झालेला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. केकेआरचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध गुरुवारी होणार असून घरच्या मैदानावरील त्यांचा हा तिसरा सामना असेल. मात्र त्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.या सामन्यात केकेआरने त्यांचे फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन या दोघांनाही वगळले होते. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय - केकेआरला चांगलाच महागात पडला. पंजाबचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने दुसऱ्या षटकात अतिशय तिखट मारा केला.
konkansamwad 
