दिव्यांग बांधवांसाठी परुळे बाजार येथे विभागवार मेळावा संपन्न...शासकीय योजनांची माहिती व नोंदणी
परुळेबाजार
परुळेबाजार, कुशेवाडा, भोगवे, चिपी या गावांतील दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आणि परुळेबाजार ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विभागवार दिव्यांग मेळावा घेण्यात आला.शुक्रवार दि. 19/06/2026 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत हा मेळावा पार पडला. माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच प्रणिती आंबड पालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, भाजपा उपजिल्हा प्रमुख बाळू देसाई, सरपंच निलेश सामंत, उपसरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच प्राजक्ता चीपकर, सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, पोलीस पाटील संदेश पवार, सुनील चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे अनिल शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.मेळाव्यात दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. पेन्शन योजना, व्यवसाय प्रशिक्षण, दिव्यांग विवाह नोंदणी, रेल्वेपास, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल, ऑनलाईन प्रमाणपत्र, UDID KYC आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ज्यांची ऑनलाईन नोंदणी किंवा प्रमाणपत्र राहिले होते, अशा दिव्यांगांची तातडीने नोंदणी करून UDID KYC करण्यात आली. कमी दृष्टी, पॅरालिसीस, अपघातामुळे दिव्यांगत्व आलेल्या लाभार्थ्यांचीही नोंद घेण्यात आली. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी मेळाव्यात विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, दिव्यांग बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा. नोंदणीसाठी UDID स्वावलंबन कार्ड, अपंग प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पासपोर्ट फोटो सोबत आणावेत. अस्थिव्यंग असल्यास 4x6 आकाराचा फोटो आवश्यक आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित दिव्यांग लाभार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.परुळेबाजार व परिसरातील गावांतील दिव्यांगांसाठी हा मेळावा उपयुक्त ठरला.
konkansamwad 
