जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत काँग्रेस राबवणार 'विशेष एसआयआर यंत्रणा'.....जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती

जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत काँग्रेस राबवणार 'विशेष एसआयआर यंत्रणा'.....जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती

मालवण

 

    भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सध्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदार संघांत काँग्रेसच्या वतीने विशेष एसआयआर यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.या बैठकीला महाराष्ट्रातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना पाचारण करण्यात आले होते. यामध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक आणि व्यावहारिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.सध्याच्या मतदार यादी प्रक्रियेत अनेक नागरिकांच्या नावांबाबत अनिश्चितता निर्माण होणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी, मतदार नोंदणीतील त्रुटी तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता कशी राखली जावी, यावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विशेष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत आपली मते मांडली.लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रक्रियेत पक्षाच्या वतीने 'बीएलओ' म्हणून काम करणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाच्या वतीने 'बीएलओ' नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून काम करावे आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आबा दळवी व इतर प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांतील मतदार याद्या दोषमुक्त आणि अद्ययावत करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते 'एसआयआर यंत्रणा' व 'बीएलओ'च्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचतील असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.