दोडामार्ग-भेडशी मार्गावर दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

दोडामार्ग-भेडशी मार्गावर दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

दोडामार्ग


      दोडामार्ग-भेडशी मार्गावरील स्नेह रेसिडन्सीजवळ दुचाकी आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेत दुचाकीवरून रंगकामाच्या ठिकाणी जाणाऱ्या दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला, तर टाटा मॅजिकचा चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भेडशीहून दोडामार्गाच्या दिशेने येणाऱ्या टाटा मॅजिक गाडीचा चालक रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीवर गाडी जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही भावांच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. राजकुमार झाटव (वय २५, अविवाहित) आणि अर्जुन झाटव (वय ३०, विवाहित – त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुले आहेत) अशी मृत भावांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अरवल गावचे रहिवासी असून, सध्या दोडामार्ग येथे एका कंत्राटदाराकडे राहून रंगकामाची (पेंटिंग) कंत्राटी कामे करत होते. नेहमीप्रमाणे दोघेही एकत्रच कामासाठी निघाले होते; मात्र रस्त्यावरील खड्ड्याने दोघांचाही घात केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत असून, पोट भरण्यासाठी परराज्यातून आलेल्या दोन कर्त्या भावांचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.