विक्री थांबली, खरेदी वाढली! परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा भारतीय बाजारपेठेला पसंती

विक्री थांबली, खरेदी वाढली! परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा भारतीय बाजारपेठेला पसंती

मुंबई


    भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास आणि देशांतर्गत शेअर बाजारातील दमदार कामगिरीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. परताव्याच्या अधिक संधी उपलब्ध असल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा पुन्हा भारताकडे वळवला असून, नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत समभागांमध्ये ६० हजार कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी सांगितले की, "गुंतवणूकदार नेहमी तिथेच गुंतवणूक करतात जिथे त्यांना अधिक परतावा मिळण्याच्या संधी दिसतात. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीच्या या अलीकडील पुनरागमनाकडे कोणतीही मोठी किंवा अनपेक्षित घडामोड म्हणून पाहण्याची गरज नाही." परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत पूर्वीपासूनच सक्रिय असून, विविध बाजारपेठांमधील नफ्याच्या संधींचा विचार करूनच ते गुंतवणुकीचे निर्णय घेतात. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर उच्च असल्याने अधिक गुंतवणूकदार देशांतर्गत शेअर बाजारात येत असल्याचेही मिश्रा यांनी नमूद केले. मागील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर समभाग विक्री करून गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पुन्हा जोरदार खरेदी सुरू केल्याने बाजारातील चित्र बदलले आहे. आकडेवारीचा विचार करता, चालू वर्षातील त्यांची आतापर्यंतची एकूण निव्वळ विक्री सुमारे २,३४,४४७ कोटी रुपये इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, नोव्हेंबरमधील ६० हजार कोटी रुपयांहून अधिकची ही नवीन खरेदी मागील दोन महिन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याच्या प्रवाहातील एक महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल मानली जात आहे.