'दत्तक पालक' उपक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

'दत्तक पालक' उपक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

वेंगुर्ला

 

        महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, वेंगुर्ला ही संस्था मागील ३ वर्षे 'दत्तक पालक' उपक्रम राबवित आहे. यंदाचे चौथे वर्ष आहे. यावर्षी होतकरू, अभ्यासू व आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ४२ विद्यार्थ्यांना 'दत्तक पालक' उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले असून त्यांना वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते शालेय साहित्य वितरीत करण्यात आले. वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉलमध्ये २१ जून रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर, वैभवी कसालकर, शिक्षक नेत्या सुरेश कदम, तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, राज्य प्रतिनिधी सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, निलम बांदेकर, शंकर वजराटकर, कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निकिता ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्षा ऋतुजा जंगले, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला संचालक सीताराम लांबर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर आदी उपस्थित होते. दत्तक पालक उपक्रमासाठी वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ६५ शिक्षकांनी आर्थिक सहकार्य केले. शिक्षक समितीच्या उपक्रमाबद्दल ओतारी यांनी गौरवोद्गार काढले. वेंगुर्ला शाखेचे कार्य इतर संघटनांसाठी प्रेरणा घेण्यासारखे आहे असे प्रतिपादन जयप्रकाश चमणकर यांनी केले. राजन कोरगावकर यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले तर प्रसाद जाधव यांनी राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांची संघटना नसून शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाची, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणारी आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठीची एक शक्ती असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात नवनियुक्त शिक्षकांना ओळखपत्र वितरण, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान आणि दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षक नेते सिताराम नाईक यांनी, सूत्रसंचालन भूषण नाईक व प्राजक्ता आपटे यांनी केले तर आभार रामा पोळजी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक समिती पदाधिकारी व सभासद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.