जिल्हा सरपंच सेवा संघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार
सावंतवाडी
जिल्हा सरपंच सेवा संघ, सावंतवाडी वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांचा जिल्हा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रेमानंद देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.काही महत्वाच्या कामामुळे उपाध्यक्ष श्री. दादा साईल उपस्थित राहू शकले नाहीत. मौजे इन्सुली येथील "देवांगी मंगल कार्यालय " येथे कार्यक्रमांचे आयोजन सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोद भाई कामत, जिल्हा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री.हनुमंत पेडणेकर, शेर्ले पंचायत समिती सदस्य श्री. महेश धुरी, कुंदे माजी सरपंच श्री. सचिन कदम, हुमरस माजी सरपंच श्री. अनुप नाईक, कणकवली फोंडाघाट माजी सरपंच श्री. संतोष आंग्रे, वेत्ये सरपंच श्री.गुणाजी गावडे, कवठणी सरपंच श्री. अजित कवठणकर, तळवणे सरपंच श्री. समीर केरकर ,किनळे सरपंच श्री.दीपक नाईक, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा निरवडे माजी सरपंच श्री. प्रमोद गावडे, रोणापाल माजी सरपंच श्री.सुरेश गावडे, सातोळी बावळट माजी सरपंच श्री. दीनानाथ कशाळकर, नाणोस माजी सरपंच श्री. वासुदेव जोशी, केसरी माजी सरपंच श्री.देवेंद्र सावंत , निगुडे माजी सरपंच श्री.समीर गावडे , कुणकेरी माजी सरपंच श्री.बाळू सावंत , कुंब्रल माजी सरपंच श्री.प्रवीण परब, वाफोली उपसरपंच विनेश गवस,धाकोरे उपसरपंच श्री. बाबल गावकर , निगुडे उपसरपंच श्री. गुरूदास गवंडे, देवांगी हाॅलचे मालक श्री उमेश पेडणेकर व श्री.औंदूबर पालव आदी आजी माजी सरपंच, उपसरपंच,सरपंच उपस्थित होते, यावेळी आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच किनळे श्री.दीपक नाईक व वेत्ये सरपंच श्री. गुणाजी गावडे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोद कामत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व शिव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. श्री.सुरेश गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भाई सन १९९१ साली नेतर्डे गावचे सरपंच झाले व मी रोणापाल गावचा ग्रामपंचायत सदस्य झालो ,त्यानंतर २०१८ मध्ये मी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली व गावाचा कारभार करण्याची संधी मिळाली. आमची सरपंच संघटना ही सन २०१८ रोजी पासून उदयास आली, तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी हे असताना प्रशासक काय असते आणि सरपंचांच्या काय भावना असतात ते त्यांना आम्हीं संघटनेच्या माध्यमातून दाखवून दिले, जिल्ह्यातील डाटा ऑपरेटर, सीआरझेड, स्ट्रिट लाईट वीजबील ,वित्त आयोग,आपले सेवा सरकार केंद्र आदी कुठचेही विषय असु दे ,आम्ही सरपंच संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला. दोडामार्ग ते वैभववाडी इथपर्यंत आमच्या कोणत्याही सरपंचावर काही प्रसंग आला तर वेळ प्रसंगी धावून जात मदत करणे अशी आमची एकी होती आणि ती मैत्री आम्हीं आजही जपत आलो, यावेळी कुंदे सरपंच श्री. सचिन कदम यांनी अध्यक्षांना विनंती केली की , जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जसं सदस्य किंवा सभापती साठी दालन असतं तसेच दालन जिल्ह्यातील सरपंचांना आपण जिल्हा परिषद मध्ये उपलब्ध करून द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यानंतर श्री. प्रमोद गावडे, श्री.गुणाजी गावडे, श्री. हनुमंत पेडणेकर, हुमरस माजी सरपंच श्री. अनुप नाईक यांनी शुभेच्छ्या दिल्या.तसेच जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनीही मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना सांगितलं की, श्री. कामत भाई हे नेतर्डे गावातून सरपंच पदाची धुरा सांभाळत आज जिल्हा परिषद चे अध्यक्ष झालात आणि दुसरं आमचे जिल्हा सरपंच संघटनेचे सचिव तथा पणदूर गावचे माजी सरपंच श्री. तुकाराम उर्फ दादा साईल हे जि.प.चे उपाध्यक्ष झालेत, अश्या या दोन्हीं मान्यवरांचा सत्कार करण्याचा योगायोग आज आम्हां आजी- माजी सरपंचाना मिळाला ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे , त्यामुळेच लोकनियुक्त सरपंच म्हणून गावचा कारभार करताना येणा-या अडचणी काय असतात ते मा.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना त्याची पुर्ण जाण असल्याने ते निश्चितच सरपंचाना सहकार्य करतील यात कोणतेही दुमत व शंका नाही. प्रशासनावर अंकुश ठेवणारे आज जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष लाभलेत यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे , सन २०१८ ते २०२२ या पाच वर्षातील कार्यकाळात सर्व सरपंच हे जिल्हा सरपंच संघटनेला जोडले गेल्याने संघटनेच्या माध्यमातून वेळवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील एकही सरपंच कधी गैर व्यवहारात दोषी आढळलेला नाही. ही सरपंच संघटनेच्या कामाची पोच पावती होती. अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, आज माझा हा सत्कार आजी माजी सरपंच महोदयांनी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीन करण्यात आला तो मी कधीही विसरणार नाही परंतु आपले प्रेम आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहो, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ,ग्रामपंचायत स्तरावर काम करताना मी अनेक अनुभव पाहिलेत त्यामुळे मला त्या सर्व गोष्टी ज्ञात आहेत, त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी बोलून आपला जो "सरपंच दालन" जिल्हा परिषद व्हावे आपल्या ज्या काय मागण्या असतील त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी थांबता यावं आपले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मी पुरेपूर प्रयत्न निश्चितच करीन .कारण गावचा विकास हा प्रथम नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून सरपंचांचा हातात आहे त्यामुळे मी कुठेही अन्याय करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे नाव महाराष्ट्र राज्यात अग्रेसर आलं पाहिजे. यासाठी माझे पुरेपूर प्रयत्न राहतील असा मी आत्मविश्वास आपणास देतो. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंब्रल गावचे माजी सरपंच प्रवीण परब यांनी केले तर आभार सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत पेडणेकर यांनी मानले, यावेळी मोठ्या संख्येने आजी-माजी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
konkansamwad 
