बांदा येथे 'खासदार नारायण राणे चषक' क्रिकेट स्पर्धेचा ८ एप्रिलपासून रंगणार थरार
बांदा
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'खासदार नारायण राणे चषक' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बांदा येथे करण्यात आले आहे ही स्पर्धा ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत पाटेश्वर मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती आयोजकांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली असून, क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत आकर्षक असून प्रथम पारितोषिक १ लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. रोख रकमेसोबतच विजेत्या संघाला मानाचा 'खासदार चषक' देऊन गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर अशी वैयक्तिक बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा 'एक गाव एक संघ' या संकल्पनेवर आधारित असेल, मात्र प्रत्येक संघाला आपल्या संघात दोन आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली आहे.पत्रकार परिषदेत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, सुनील धामापूरकर यांच्यासह बांदा परिसरातील असंख्य क्रिकेटप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेच्या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत. बांदा आणि परिसरातील जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

konkansamwad 
