मालवणच्या नागरी समस्यांवर शिवसेनेचे उपोषण......मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

मालवणच्या नागरी समस्यांवर शिवसेनेचे उपोषण......मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

मालवण

      मालवण शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी आज स्वातंत्र्यदिनी मालवण नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण छेडले. या उपोषणाला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. उपोषणस्थळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसमवेत चर्चा केली.उपोषणादरम्यान तपस्वी मयेकर यांनी मालवणसाठी मंजूर नळपाणी योजनेचे काम निविदेतील अटींनुसार होत नसल्याचा आरोप केला. योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेचा प्रमुख ठेकेदाराचा नातेवाईक असल्याने दर्जावर नियंत्रण नाही, असे त्यांनी सांगितले. गेली 20 वर्षे भुयारी गटार योजना अपूर्ण आहे. त्यासाठी आलेला निधी, झालेला खर्च आणि मुदत याबत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.देऊळवाडा ते भरड या मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे आणि स्टॉलमुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने ती हटवावीत अशी मागणी करण्यात आली. तसेच घरोघरी कचरा उचलण्याचा ठेका 2 कोटी रुपयांचा असूनही सेवा पूर्वीसारखीच आहे. निविदेच्या अटी न पाळणाऱ्या ठेकेदाराला तरीही बिल दिले जात असल्याचा आरोप नगरसेवक मंदार ओरसकर यांनी केला.मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. नळपाणी आणि भुयारी गटार योजनेबाबत एका महिन्याच्या आत आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. देऊळवाडा ते भरड रस्त्यालगतची अतिक्रमणे गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस विभागाच्या मदतीने हटविणार असल्याचे स्पष्ट केले. कचरा उचलण्याच्या ठेकेदारावर तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन त्यांनी तपस्वी मयेकर यांना दिले.हे आश्वासन मिळाल्यानंतर तपस्वी मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.या उपोषणात शिवसेना नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी यांच्यासह मनसे, काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.