कुडाळ-वालावल येथे डोंगरातील भला मोठा दगड कोसळून घराचे नुकसान
कुडाळ
गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालावल येथील मुर्तळीवाडी-मुंड्याचा कोंड येथे डोंगरातील माती सरकून एक भला मोठा दगड खाली कोसळल्याची घटना घडली आहे. हा दगड डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घराच्या भिंतीला येऊन धडकला. यात घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून नुकसान झाले आहे. सुदैवाने, दगड आदळताच घरातील सर्व माणसे तातडीने बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाह.या परिसरामध्ये डोंगराच्या पायथ्याशी नागरी वस्ती असून मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. काही वेळातच एक प्रचंड मोठा दगड डोंगरावरून वेगाने खाली घसरत आला आणि थेट सुधाकर राऊळ यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीला येऊन अडकला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी सोनाली मयेकर, पोलीस पाटील अक्षय राऊळ आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.सुधाकर राऊळ यांच्या घराशेजारीच आणखी एक घर असून ही दोन्ही घरे डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजेच थेट धोक्याच्या छायेत आहेत. संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने या दोन्ही कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थानी जाण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. तसेच दोन्ही कुटुंबांना रीतसर नोटिसा बजावून या संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात येणार आहेत. दरम्यान, घराला धोका ठरणारा हा भला मोठा दगड हटवण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने करण्यात आले.
konkansamwad 
