सोनुर्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'रिल्स स्टार' स्पर्धेचे आयोजन

सोनुर्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'रिल्स स्टार' स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी

 

     सोनुर्ली (जाधववाडी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली यांच्या वतीने “Reel Star” या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेचा विषय “काव्य रमाईचे, दिव्य भीमाचे” असा असून समाजप्रबोधन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ३५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १५०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नसून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ६० ते ९० सेकंदांचा रील व्हिडिओ तयार करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२६ सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. निवड झालेल्या स्पर्धकांचे सादरीकरण २९ एप्रिल रोजी सादर करण्यात येणार असून स्पर्धेतील नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच स्पर्धेसाठी पाठवलेले व्हिडिओ इतर सोशल मीडियावर अपलोड करता येणार नाहीत, अशी अट आयोजकांनी घातली आहे. अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी आयोजकांनी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.ही स्पर्धा युवकांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासोबतच समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.