ट्रक - कारच्या धडकेत विजयदुर्गची महिला ठार

कणकवली
चिरे वाहतूक करणारा ट्रक व कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील महिला ठार झाली. सुप्रिया सुनील जावकर (56, रा. विजयदुर्ग-विठ्ठलवाडी) असे तिचे नाव आहे, तर कारमधील बालकासह 2 प्रवासी गंभीर जखमी असून अन्य 4 जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात तळेरे-विजयदुर्ग मार्गावर दारूम व बुरंबावडेच्या सीमेवर झाला.फणसगाव परिसरातील चिरेखाणीतून निपाणीकडे चिरे वाहतूक करणारा ट्रक दारूम-बुरंबावडे सीमेवर आला असता याच दरम्यान तळेरे ते विजयदुर्ग जाणारी कार अचानक समोर आली व त्यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातानंतर स्थानिकांसह पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अनिरुद्ध मुद्राळे, चालक रूपेश राणे यांनी घटनास्थळी दाखल होत मदत केली.या अपघातातील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहे.