वैभववाडी खांबाळेत भीषण रिक्षा अपघात.....६ जखमी
वैभववाडी
चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा झाडावर आदळली. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. यामध्ये पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. दोघ गंभीर जखमी झाले असून ही घटना खांबाळे आदिष्टी मंदिरनजीक घडली. गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व जखमी सोनाळी बौद्धवाडी येथील आहेत.वैभववाडीहून फोंड्याच्या दिशेने भोसले कुटुंबातील सहाजण रिक्षाने प्रवास करत होते. फोंड्याकडे जात असताना रिक्षा खांबाळे आदिष्टी मंदिर नजीक आली असता, चालक सुजल भोसले याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा थेट रस्त्याच्या बाहेरील झाडावर आदळली. यात रिक्षेचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात सुशांत सिद्धार्थ भोसले (२६), स्नेहांश सुशांत भोसले (५), स्वप्नाली योगेश भोसले (३०), सुजल सिद्धार्थ भोसले (३२), अनिल पांडुरंग भोसले (१७), सोजवी सिद्धार्थ भोसले (२९) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात पाच वर्षीय स्नेहांश हा रिक्षात अडकला होता. खांबाळे गावचे उपसरपंच गणेश पवार, योगेश पवार, दीपक पवार, जयेश पवार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत स्नेहांशला रिक्षातून बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.