कर्णधार रोहित शर्माची अचानक कसोटीमधून निवृत्ती

कर्णधार रोहित शर्माची अचानक कसोटीमधून निवृत्ती

 

मुंबई

 

        भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करत मोठा धक्का दिला.हिटमॅन म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटला निरोप दिला. रोहितच्या निवृत्तीची बातमी त्याच वेळी आली जेव्हा निवड समितीने त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंड दौऱ्यावर संघात स्थान मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. रोहितने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या २८० क्रमांकाच्या कसोटी कॅपचा फोटो पोस्ट केला. यासोबतच त्याने निवृत्तीची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषतः त्याचे कर्णधारपद धोक्यात होते. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ०-३ असा क्लीन स्वीप झाल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या पराभवानंतर रोहित कर्णधारपदावर राहिल याबाबत शंका होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कामगिरीनंतर रोहित शर्माला कसोटी संघात स्थान मिळेल याबाबत शंका होती. रोहितला आशा होती की तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि संघाचे नेतृत्व करेल. पण मंगळवारी, ६ मे रोजी निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ज्याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली होती आणि बीसीसीआयने देखील हिरवा कंदील देण्याच म्हटल. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटची डेब्यू कॅपचा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिल की, "हॅलो, मला सर्वांना हे सांगायच आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करण हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतक वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताच प्रतिनिधित्व करत राहणार आहे."रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. पुढच्या कसोटीतही शतक ठोकून त्याने एक विशेष कामगिरी केली. त्यानंतर, पुढील ६ वर्षे, तो या फॉरमॅटमध्ये संघर्ष करत राहिला आणि संघात सतत आत-बाहेर होताना दिसला पण २०१९ मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत, रोहितला या फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच सलामीवीराची भूमिका दिली आणि इथून त्याच्या कारकिर्दीने नव वळण घेतल. रोहितने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावली होती आणि त्यानंतर तिसऱ्या कसोटीतही द्विशतक झळकावले होते. तेव्हापासून, रोहित संघाचा सलामीवीर होता आणि त्याने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. २०२२ मध्ये, विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर, रोहितला टीम इंडियाचा कर्णधारही बनवण्यात आले. रोहितने एकूण ६७ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ४३०१ धावा केल्या. त्याने ४०.५७च्या सरासरीने या धावा केल्या आणि यादरम्यान त्याने १२ शतक आणि १८ अर्धशतक झळकावली. रोहितच्या खात्यात २ विकेटही आहेत.