चक्क आंबा बागेत ‘रोप-वे' ची निर्मिती.....मूळ कुडाळच्या इंजिनिअरने रचली यशस्वी मुहूर्तमेढ
देवगड
कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या बहुतांश भागातील आंबा बागायती या चढउताराच्या जमिनीवर अथवा डोंगर भागात विस्तारलेल्या आहेत. आंबा फळाची काढणी झाल्यानंतर ते क्रेटच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी नेण्यासाठी बागेतील कामगारांना उंचसखल भागातून पायी चालत अथक मेहनत घ्यावी लागते. परिणामी शारीरिक कष्ट व वेळही अधिक लागतो. याला पर्याय म्हणून कुडाळ येथील इंजिनिअर सुनील पेठे यांनी विजयदुर्ग येथील एका बागेत 'रोप-वे' सारखा अत्याधुनिक प्रकल्प स्वकल्पनेने राबविला आहे. या प्रकल्पाद्वारे बागायतींमध्ये आंबा फळाच्या क्रेटसह खते, औषधांची अथवा अवजड वस्तूंची ने-आण करणे अधिक सोपे होणार आहे. देवगड तालुक्यात प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. विजयदुर्ग येथील संजीव उर्फ चंदू वेलणकर यांच्या कलम बागेत सुनील पेठे यांनी खास आंबा फळासाठी 'रोप-वे' प्रकल्पाची निर्मिती केली आहे. चंदू वेलणकर यांची बाग ही उंचसखल जमिनीवर विस्तारलेली आहे. तेथे सुनील पेठे यांनी सुमारे १०० मीटर अंतरासाठी रोप-वे प्रकल्प राबविला आहे.मूळ कुडाळ येथील सुनील पेठे हैं इंजिनिअरींग क्षेत्रातील खासगी कंपनींमध्ये कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते आपल्या खासगी व्यवसायानिमित्त कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना फिरण्याचा छंद असल्याने गेली अनेक वर्षे ते हापूस आंबा बागायतींमधील कामांचे परीक्षण व आढावा घेत होते. या छंदातूनच त्यांना आंबा कलम बागांमध्ये रोप-वे निर्मितीची संकल्पना सूचली. अन् या संकल्पनेची यशस्वी मुहूर्तमेढ त्यांनी आपल्या इंजिनिअरींग क्षेत्रातील ज्ञानसंपन्न अनुभवाने विजयदुर्गमध्ये रोवली. यासाठी त्यांना पत्नी सौ. मंजुषा पेठे यांचे सहकार्य लाभले. मध्यभागीही आंबा फळाच्या क्रेटची उचल घेण्यासाठी एक टप्पा ठेवण्यात आला आहे. रोप-वेद्वारे वाहतूक वजन क्षमता सुमारे १०० किलो अथवा आंब्याने भरलेले चार क्रेट एवढी आहे. सखल भागातून आंबा क्रेट चढ भागातील आवश्यक ठिकाणी उतरविण्यासाठी या रोप-वेद्वारे केवळ एका मिनिटांचा अवधी लागतो. उंच-सखल भागाच्या परिस्थितीनुसार हे वजन व वेळ कमी जास्त होऊ शकेल. आंबा बागायतीमध्ये बागायतदार औषध फवारणीसाठी वापरत असलेल्या मशीनद्वारे रोप-वेची यंत्रणा कार्यान्वित होते. औषध फवारणी मशीनला पेट्रोलची आवश्यकता असते. परंतु हा रोप-वे आपण मॅन्युअलीदेखील हाताळू शकतो.उंचसखल भागाशिवाय जमिनीच्या समांतर भागातही हा रोपवे प्रकल्प आपण राबवू शकतो. या प्रकल्पाची अंतिम टप्यातील चाचणी यशस्वी झाली असून हा प्रकल्प बागायतदारांना नव्या तंत्रज्ञानाशी ओळख करून देणारा ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.सध्या आंबा बागायतींमध्ये कामगार मिळणे व त्यांना सांभाळणे बागायतदारांसाठी खर्चिक व डोकेदुखीचेही बनले आहे. रोप-वेसारखा प्रकल्प माणसांच्या मेहनतीची गरज भागविणारा प्रकल्प असून रोप-वेसारखे ऑटोमेशन प्रकल्प काळाची गरज आहेत. विजयदुर्ग येथील बागेत राबविलेल्या या प्रकल्पाला इतर बागायतदारांनीही पसंती दर्शविली असल्याचे सुनील पेठे यांनी सांगितले.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेली 'वन टाईम इन्व्हेस्टमेंट' ही पुढील पाच ते सहा वर्षाच्या शारीरिक व मानसिक कष्टाची बचत करणारी आहे. हा प्रकल्पाच्या मेन्टेनन्सचा वार्षिक खर्चही अल्प प्रमाणात आहे.देवगड हा समुद्र किनारपट्टीवरील तालुका असला तरी तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रकल्पांतर्गत आवश्यक उपाययोजनाही तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच हा रोप-वे प्रकल्प कशाप्रकारे कार्यान्वित करायचा, याचे संपूर्ण ट्रेनिंगही संबंधित बागायतदारांसह त्यांच्या काही कामगारांना दिले जात असल्याचे सुनील पेठे यांनी सांगितले.ऊन, वारा, पाऊस अशा सर्वच हंगामात हा रोपवे प्रकल्प बागायतदारांसाठी खर्च, वेळ व पैशांची बचत करणारा ठरणार आहे. या रोपवे प्रकल्पाद्वारे फळांच्या क्रेटची ने-आणच नव्हे, तर खते, औषधे बागायतींमध्येही नेणे सुलभहोणार आहे.रोप-वे उंची, अंतर तसेच उंच-सखल भागाच्यादृष्टीने कार्यान्वित राहणाऱ्या यंत्रणेनुसारं रोप वे प्रकल्पाच्या निर्मितीचा खर्च अवलंबून आहे. या प्रकल्पाच्या इन्स्टॉलेशनसाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो. इन्स्टॉलेशनच्या इलेक्टीक उपकरणांसाठी बागांमध्ये वीज पुरवठ्याची समस्या येते. तेथे इन्स्टॉलेशनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातो,असेही सुनील पेठे यांनी स्पष्ट केले.

konkansamwad 
