चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारसह दोन दुचाकींना उडविले

सावंतवाडी
चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींसह ब्रिझा कारला धडक दिल्याचा प्रकार कारीवडे-पेडवेवाडी येथे घडला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाड्या बाजूच्या दुकानात गेल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र या घटनेमुळे आंबोली-सावंतवाडी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उशिरापर्यंत दाखल झाले नसल्यामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, चंदगड येथे राहणारा समीर सय्यद हा आपल्या ताब्यातील चिऱ्याचा ट्रक घेऊन चंदगडच्या दिशेने जात होता. मात्र कारीवडे-पेडवेवाडी येथील बाजारपेठेत आल्यानंतर त्याच्या गाडीचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या सुजाराम माळी (रा. बेळगाव) यांच्या ब्रिझा कारसह दीपक कारवडेकर (रा. कारिवडे) आणि मुसाफिर हसमी (रा. उत्तर प्रदेश) या दोघांच्या दुचाकीला त्याने उडवून दिले. या तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही.