फोंडाघाट महाविद्यालयात ‘केक मेकिंग सर्टिफिकेट कोर्स’चा उद्घाटन समारंभ संपन्न
फोंडाघाट
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट यांच्या करिअर गाईडन्स सेलच्यावतीने तसेच जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘केक मेकिंग सर्टिफिकेट कोर्स’ या कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसून, रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षणाची नितांत गरज आहे, या जाणिवेतून हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सतीश कामत यांनी प्रभावी प्रास्ताविक केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबत कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण व निमशहरी भागातील युवक-युवतींसाठी अशा अभ्यासक्रमांचे महत्त्व अधिक असून, केक मेकिंगसारखे प्रशिक्षण आर्थिक स्वावलंबनाची दारे उघडणारे ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यानंतर उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षिका सौ. पूजा सावंत यांनी प्रशिक्षणाची सविस्तर रूपरेखा मांडली. केक मेकिंगमध्ये वापरण्यात येणारे साहित्य, विविध प्रकारचे केक, सजावट, गुणवत्ता, खर्च-उत्पन्नाचे नियोजन तसेच ग्राहक व्यवस्थापन या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य नियोजन व सातत्य ठेवल्यास केक मेकिंग हा एक यशस्वी आणि टिकाऊ व्यवसाय ठरू शकतो, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यानंतर जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक श्री. सुहास पालव यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे अनेक लाभार्थी आज यशस्वीपणे रोजगार व स्वयंरोजगार करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणातून आत्मनिर्भर बनावे असे मौलिक मार्गदर्शन श्री. सुहास पालव यांनी केले. पुढे ते म्हणाले की, जन शिक्षण संस्थानतर्फे राबविण्यात येणारे अभ्यासक्रम हे अत्यंत किफायतशीर असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही ते सहज परवडणारे आहेत. महाविद्यालयाच्या सहकार्याने भविष्यातही असे उपक्रम जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी राबविले जातील, असेही त्यांनी आश्वासन दिले. आजचा काळ हा नोकरीपुरता मर्यादित न राहता कौशल्य, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचा आहे. समाजातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे, हा या केक मेकिंग सर्टिफिकेट कोर्सचा मुख्य उद्देश आहे. केक मेकिंग हा केवळ पाककलेचा भाग नसून, घरगुती उद्योग, बेकरी व्यवसाय, कॅटरिंग सेवा तसेच ऑनलाइन ऑर्डरच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करणारा व्यवसाय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमासाठी उपस्थित फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. संदेश सावंत यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर भर दिला. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणासोबत एखादे तरी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करणारे कौशल्याधारित शिक्षण देण्याचा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य मा. डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास साधण्याचा सल्ला दिला. फोंडाघाट महाविद्यालय हे शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर देत असून, भविष्यातही विविध रोजगाराभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. केक मेकिंग प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांनी शुभेच्छा देऊन हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत व्यावसायिक प्रशिक्षण पोहोचवणे, हा आमचा मुख्य हेतू असून, फोंडाघाट महाविद्यालयाच्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून हे कार्य सातत्याने केले जात असल्याचे प्राचार्य डॉ. नारे यांनी यावेळी नमूद केले.
या उपक्रमासाठी जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक श्री राकेश खरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक प्रा. डॉ. बाजीराव डाफळे यांनी केले. या उद्घाटन समारंभास प्रशिक्षणार्थींसह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

konkansamwad 
