वेंगुर्ला येथे ८ दिवसांचे समृद्ध उन्हाळी शिबिर संपन्न

वेंगुर्ला येथे ८ दिवसांचे समृद्ध उन्हाळी शिबिर संपन्न

 

वेंगुर्ला

 

    वनशक्ती आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ दिवसीय उन्हाळी शिबिर विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरले. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता, सृजनशीलता आणि प्रयोगशीलता वाढवणे हा होता. या शिबिरात विद्यार्थ्यांनी निसर्गभ्रमंती, फुलपाखरू गणना, पक्षीनिरीक्षण, पाणथळ भूमी भेट, बागकाम यांसारख्या उपक्रमांद्वारे निसर्गाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केला. क्षेत्र भेटी, पानांच्या रचना (leaf manipulation), प्रयोगशाळेतील उपकरणांची ओळख, सीड बॉल व द्रव खते तयार करणे या माध्यमातून वैज्ञानिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केले.सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या फुलांची रचना, इकोप्रिंटिंग, बाटली सजावट, दगड चित्रकला, झेन्टॅंगल आर्ट यांसारख्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमता विकसित झाल्या. तसेच लोणच, फुलांचे पेये, सॉलिड परफ्युम, बोन्साय तयार करणे, हे पारंपरिक व पर्यावरणपूरक उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करून अनुभवले. लाठी-काठी आणि तंबू उभारणीसारख्या शारीरिक व सांस्कृतिक उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि टीमवर्कचे मूल्य निर्माण केले.शिबिराचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी “निसर्ग संवर्धनासाठी योगदान” असा संकल्प करण्यात आला. या वेळी वनशक्तीच्या करिश्मा मोहिते, खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पती विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील उपस्थित होत्या. शिबिराचे आयोजन केवळ एक शैक्षणिक उपक्रम न राहता, पर्यावरणाशी सुसंवाद साधणारे अनुभवात्मक शिक्षण ठरले, याचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.