रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर अडकून पडलेले रेल्वे प्रवासी २५ बसेसद्वारे मुंबईकडे रवाना.

रत्नागिरी :
कोकण रेल्वे मार्गावर खेडनजीक दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या रविवारच्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांना एसटीच्या बसेसमधून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पनवेलच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाहून रेल्वेची वाहतूक अजूनही बंदच आहे.
दरड कोसळल्यानंतर रत्नागिरी स्थानकावर रोखून ठेवण्यात आलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेले प्रवासी
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे रुळांवर दरडीची माती येऊन रेल्वे वाहतूक रविवारी सायंकाळपासून बंद आहे. या दुर्घटनेमुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांच्या जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान या घटनेमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने एसटी कडून 25 बसेस बोलावल्या. रत्नागिरीसह खेडे चिपळूण रेल्वे स्थानकावर खळंबा झालेल्या प्रवाशांना या बसेस मधून मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आले.