गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित

गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित

 

सावंतवाडी

 

    गणेशोत्सवाच्या निमित्ताने निरवडे बांदिवडेकरवाडीत मनोज मदन बांदिवडेकर आणि बांदिवडेकर कुटुंबीयांनी उभारलेली गणेश सजावट यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. गणपतीसमोर सावंतवाडी रेल्वे स्थानकाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, कोकण रेल्वेवरील बोगदे, सावंतवाडी रोड स्थानक, रिक्षा, बसस्थानक यांचेही वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले आहे. यासोबतच सावंतवाडी रेल्वे टर्मिनससंबंधी रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून झळकलेल्या बातम्यांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे हा देखावा फक्त कलात्मकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीवा देणारा ठरत आहे. या सजावटीबद्दल बोलताना बांदिवडेकर कुटुंबीयांनी सांगितले की, “अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा या देखाव्याच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचावी हीच आमची भावना आहे.” गणेश भक्तांची या अनोख्या देखाव्याला मोठी गर्दी होत असून, परिसरात सजावटीची चर्चा रंगली आहे.