उत्तरप्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात; ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले. ४ जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी.

उत्तरप्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात; ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले.  ४ जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी.

लखनऊ.

   उत्तरप्रदेशच्या गोंडामध्ये चंदीगडवरुन दिब्रुगडला जाणारी दिब्रुगड एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. ही ट्रेन रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार रेल्वेचे १० ते १२ डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय रेल्वेने ही माहिती दिली आहे.
   काहीवेळा पूर्वीच दुर्घटना घडल्याने रेल्वेच्या अपघातीतील जखमींची संख्या कळू शकली नाही तसेच जिवितहानी आणि वित्तहानीबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. रेल्वे विभागाने घटनेचा तपास सुरु केला आहे. १५९०४ - डिब्रूगढ एक्सप्रेस चंदीगड वरुन डिब्रूगढला जाते, काल बुधवारी ११. ३९ च्या सुमारास ट्रेनचा प्रवास सुरु झाला होता. उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री ब्रजेश पाठर यांनी दिलेल्या माहितीनुसार चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींचा आकडा अद्याप समोर आला नाही. सीएम योगी आदित्यनाथ यांनी घटनेची चौकशी करत अधिकारी आणि यंत्रणेला घटनास्थळी धाव घेवून तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत.
   रेल्वेप्रशासनाने नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर सुद्धा जारी केला आहे. रेल्वे आणि राज्य सरकारची रुग्णवाहिनी जखमींना तातडीने हलवण्यासाठी घटनास्थळी पोहचली आहे. एसी कोचचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. ट्रेनचे डब्बे पुर्णपणे रुळावरुन उतरल्याने आदळल्याचे दिसते. डिब्रूगढ एक्सप्रेसमुळे गोरखपूर आणि लखनऊ रेल्वे मार्ग विस्कळित झाला आहे. प्रवाशांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक प्रवाशांनी घटना समजताच सामानासह ट्रेनच्या डब्ब्यामधून रुळावर उड्या मारल्या, तर काही जणांना गंभीर दुखापतीमुळे ट्रेनच्या डब्ब्यात अडकून राहावे लागले, सध्या रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी बचाव कार्य युद्ध पातळीवर करत आहे.