तोंडवळी तळाशील समुद्रकिनारी होड्या जळून खाक

तोंडवळी तळाशील समुद्रकिनारी होड्या जळून खाक

 

मालवण
 

          मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या मांगराला लागलेल्या आगीत दोन बोटी व एक पगार (छोटी होडी) व मासेमारीचे साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
         सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या मांगराला अचानक आग लागली. आगीचे लोळ आणि धूर दिसून येताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहिले असता तर रापण संघाच्या मांगराला आग लागली असल्याचे दिसून आले किनारपट्टी लगतच हा मांगर असल्याने वाऱ्याच्या वेगामुळे आग भडकत गेली यात मांगरात असलेल्या दोन बोटी व एक छोटी होडी जळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, भाई आडकर, अशोक शेलटकर, विनायक कोचरेकर, स्वप्नील तारी, महेश मालंडकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी मारण्यास सुरवात केली. मात्र वाऱ्याचा जोर जास्त असल्याने आगीच्या भडक्यात दोन नौका व छोटी होडी तसेच जाळी व अन्य मासेमारीचे साहित्य जळून खाक झाले. यात तेरेकर रापण संघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.