वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ

 

वेंगुर्ला


 

         वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ले  येथे दीप प्रज्वलाने करण्यात आला. कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सौ. नम्रता कुबल, अभी वेंगुर्लेकर, साईप्रसाद नाईक, सुनील डुबळे, डॉ. पूजा कर्पे, जगन्नाथ सावंत, साक्षी पेडणेकर, सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, वामन कांबळे, उमेश येरम, नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुकाध्यक्ष पपू परब आदी मान्यवर उपस्थित होते.
     वेंगुर्ले या शहराचा चेहरा मोहरा गेल्या दीडशे वर्षात बदलून गेला आहे. याला येथील नागरिक आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी यांची एकजूट कारणीभूत आहे. या सर्वांचे मला कौतुकच आहे. शहराला एक चांगल रूप निर्माण झाल आहे. एखाद्या गोष्टीची एखाद्या नगरपरिषदेमध्ये सुरुवात होते परंतु ते टिकवून ठेवणे तेवढ सोप नसत. इथला असणारा प्रत्येक नागरिक, घनकचऱ्या सारखा प्रकल्प असेल, गार्डन्स असतील इथला असणारा प्रत्येक विषय हा पुढच्या पिढीला आणि वेगवेगळ्या नगरपरिषदांना एक आदर्श निर्माण करून देणारा आहे, असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले.स्वच्छतेसह विविध स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पारितोषिक घेणारी कोणती नगरपरिषद असेल तर ती वेंगुर्ले नगरपरिषद आहे. नगरपरिषदेने मिळालेली पारितोषिकांच्या निधीतून शहरवासीयांसाठी विविध नागरी सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे या नगरपरिषदेचे कराव तेवढ कौतुक कमी आहे. आपण सर्वजण ज्या ताकतीने हे सर्व करत आहात त्यात मला एक आपल्याला विनंती करायचे आहे. तुम्ही हे जे नवीन विविध वास्तु उभ्या केल्या आहेत त्या टिकून राहण्यासाठी उद्योजकांना एकत्र करून त्यांचा काही सहवास आपल्याला करून घेता येईल का त्यासाठी एक प्रकल्प तयार करा. मी ही शक्य होईल तेवढे सहकार्य करेन असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी एका व्हिडिओ क्लिप द्वारे नगरपरिषदेच्या कामाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी प्रास्ताविक सादर करून नगरपरिषद प्रशासन यापुढेही शहराचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी जबाबदारीने काम करेल असे सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष राजन गिरप आणि नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले.