तिलारी धरण १००% भरले.....नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

तिलारी धरण १००% भरले.....नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

 

 

दोडामार्ग
 

       सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के भराव क्षमतेचा टप्पा गाठला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दाबामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडले आहेत. धरणातून सध्या १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणाच्या विसर्गासोबतच तेरवण मेढे येथील उन्नैयी बंधाऱ्यातूनही १६.८४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला आहे. या दोन्ही स्रोतांमधील पाणी थेट तिलारी नदीत मिसळत असल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि नदी परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिला. परिणामी अनेक ठिकाणी नाले आणि ओढे तुडुंब भरले असून तिलारी घाट परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे. तिलारी प्रकल्प विभागाकडून नागरिकांना सतत सूचना दिल्या जात असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.