परुळे येथे वाचन प्रेरणा दिन साजरा — विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी मैत्रीचा सुंदर सोहळा
परुळे
जिल्हा परिषद केंद्र शाळा परुळे क्रमांक ३ आणि महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथ संग्रहालय, परुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वाचनालयास भेट देत खास त्यांच्या साठी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचा आनंद घेतला. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यात वाचनाची सवय आणि साक्षरतेची ओढ वाढावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला वाचनालयाचे प्रथमेश नाईक, तसेच शिक्षक शालीक पाटील आणि रविंद्र गोसावी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महालक्ष्मी वाचनालयामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी आणि गावातील वाचकांनी या अंकांचा सुट्टीच्या काळात आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
वाचनालयात विविध विषयांवरील समृद्ध पुस्तक संपदा उपलब्ध असून, ग्रंथ संग्रहालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. “वाचन संस्कृतीचा दीप लावणारा हा प्रेरणादायी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरला,” असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

konkansamwad 
