आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष.

आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष.

   दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो.
   यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखले जाईल, याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजनही केले जाईल. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची कल्पना मांडली, तेव्हापासून जगभरात हा खास दिवस साजरा केला जात आहे. आपल्या भाषणात, महासभेच्या ६९ व्या सत्राच्या उद्घाटनावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘योग ही आपल्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे.
   योग मन आणि शरीर, विचार आणि कृती यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देते. योग हा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी एक सर्वांगीण मौल्यवान दृष्टीकोन आहे. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही; तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकत्वाची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे. २१ जून या दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती’ असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.