८० वर्षीय सदानंद कोचरेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण.

सिंधुदुर्ग.
निवती मेढा येथे मालकी हक्काच्या जागेत बांधण्यात आलेले पूर्वजांचे थडगे मेढा ग्रामपंचायतने उद्ध्वस्त करून कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहेत, संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सदानंद कोचरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
निवती येथील सदानंद काशीराम कोचरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांचे लक्ष वेधले आहेत. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे मेढा आडवेळ निवती, तालुका वेंगुर्ला येथील सर्वे नंबर ४ मध्ये असलेले आमचे पूर्वजांचे बांधलेले थडगे हे आम्हाला कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता मेढा ग्रामपंचायतीने द्वेषबुद्धीतून बेकायदेशीपणे उद्ध्वस्त केले आहे.तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान केलेले आहे.हे थडगे उद्ध्वस्त केल्यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या थडग्यावर पूर्वजांची नावाची पाटीसुद्धा लावण्यात आली होती. ती गायब करण्यात आली आहे.मिळकत ही खाजगी मालमत्ता आहे. तरी खाजगी मालमत्तेत असलेले पूर्वजांचे थडगे काढून टाकण्याचे हे कृत्य बेकायदेशीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.आमचे पूर्वजांचे थडगे ज्या स्थितीत होते त्या स्थितीत पूर्ववत करावे व पूर्वजांच्या नावाची पाटी शोधावी तसेच जी दुर्गम पायवाट होती तशीच पूर्वरत करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी केली.
मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून सदानंद काशीराम कोचरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.यामध्ये सुभाष कोचरेकर, उदय कोचरेकर, गणेश कोचरेकर, अक्षय कोचरेकर, चंद्रकांत कोचरेकर, काशीराम कोचरेकर आदी सहभागी झाले होते.