तरुणांनी देश सेवेसाठी पुढे यावे : पालकमंत्री रविंद्र चव्हाण. आजादी का अमृत महोत्सव सांगता समारोह संपन्न.
सिंधुदुर्ग.
देशाबद्दल सर्वांनाच अभिमान आहे. देशाच्या रक्षणासाठी व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर सैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्या बलिदानातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले.अशा शूर विरांचे योगदान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सर्वांच्या स्मरणात राहील. देश सेवेसाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सवाच्या सांगता समारोह आणि श्रावण मेळा कार्यक्रम पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडला. यावेळी ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते.यावेळी रान भाजी महोत्सवाचे उद्घाटन देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले.
पालकमंत्री म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला शूर सैनिकांप्रती अभिमान आहे.देश सेवेसाठी प्राणाची आहूती देणाऱ्या हुतात्म्ये आपल्या कायम स्मरणात राहणार. सामान्य नागरिक म्हणून आपणही देशासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहभाग घेतला पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून जगापुढे आदर्श निर्माण केला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभारुन जगात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून वीरांना नमन करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील माती अमृत कलशाच्या माध्यमातून दिल्ली येथे नेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
श्री. केसरकर म्हणाले, सध्या स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरु आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाली असून सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे. पंतप्रधानांच्या दृरदृष्ट्रीतून भारताची अर्थव्यवस्था 5 व्या स्थानावर आली असून देश प्रगतीकडे जोमाने वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

konkansamwad 
