फळबागायतदारांच्या नुकसानीबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडणार; आमदार निलेश राणेंचे आश्वासन

फळबागायतदारांच्या नुकसानीबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडणार; आमदार निलेश राणेंचे आश्वासन

वेंगुर्ले

 

      कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले असून, या संदर्भात सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी आपण आगामी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहोत, असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटने'च्या शिष्टमंडळाने आज, चिपळूण येथे आमदार राणे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते.यावर्षी बदलत्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी न्याय हक्क संघटनेने पुढाकार घेतला आहे. शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करताना आमदार निलेश राणे म्हणाले की, कोकणचा कणा असलेला बागायतदार आज अडचणीत आहे. त्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असून, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात आवाज उठवू.या भेटीवेळी वेंगुर्लेतील शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, माजी नगरसेवक पिंटू गावडे, आंबा बागायतदार कुमा ठाकूर, चेतन कुबल, माजी सभापती अभिषेक चमणकर यांच्यासह गिरीश मांजरेकर, नितेश मयेकर, मंदार गावडे, सिद्धार्थ नरसुले, सखाराम ठाकूर, सुजित चमणकर, मंदार परब व इतर अनेक बागायतदार उपस्थित होते.