सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक.....अर्ज मागे घेतल्यानंतर देखील एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात; जाणून घ्या

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक.....अर्ज मागे घेतल्यानंतर देखील एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात; जाणून घ्या

 

 

सिंधुदुर्गनगरी
 

      सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली असून, आता निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. २३ ते २७ जानेवारी या कालावधीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अनेक दिग्गजांनी माघार घेतल्याने आता मैदानात केवळ 'तगडे' उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
      जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण २३१ वैध उमेदवारांपैकी ११६ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे आता ५० गटांसाठी ११५ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. सर्वाधिक चुरस कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात पाहायला मिळणार असून, तिथे प्रत्येकी २२ आणि २१ उमेदवार रिंगणात आहेत. कणकवलीत १५, तर वैभववाडीत सर्वात कमी म्हणजे केवळ ५ उमेदवार मैदानात उरले आहेत. दुसरीकडे, पंचायत समितीच्या १०० गणांसाठी ३९८ वैध उमेदवारांपैकी १५४ जणांनी माघार घेतली आहे. आता जिल्ह्यात एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ५५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. कुडाळमध्ये ४५ तर कणकवलीत ३२ उमेदवार रिंगणात आहेत. वैभववाडी आणि दोडामार्गमध्ये अनुक्रमे १४ आणि २० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
       आता अर्जाच्या माघारीचे सत्र संपल्याने जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी आता कंबर कसली असून, २८ जानेवारीपासून होणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे.