सचिन वालावलकरांचा शिवसेना समन्वयक पदाचा राजीनामा......शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याचे म्हणणे
वेंगुर्ला
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आणि आमदार दीपक केसरकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वेंगुर्ले येथे आयोजित शिवसेनेच्या मासिक सभेत वालावलकर यांनी अनपेक्षितपणे हा निर्णय जाहीर केल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला.राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी, "पदाचा राजीनामा दिला असला तरी एक शिवसैनिक म्हणून मी सदैव सर्वांच्या सोबत राहीन," असे स्पष्ट करत त्यांनी आपली पुढील भूमिका मांडली आहे. सचिन वालावलकर हे सुरुवातीपासून आमदार दीपक केसरकर यांचे विश्वासू शिलेदार. शिवसेना पक्ष वेंगुर्लेत वाढवण्यातदेखील त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. त्यांच्या राजीनाम्यामुळे वरिष्ठांसह कार्यकर्त्यांदेखील धक्का बसला आहे. आता पक्षश्रेष्ठी या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

konkansamwad 
