परुळेबाजार ग्रामपंचायत आदर्श ठरली.....देशपातळीवरील कार्यशाळेत 'आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत' म्हणून निवड
पुणे
यशदा प्रशिक्षण संस्था, पुणे येथे आयोजित देशपातळीवरील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवडण्यात आली आहे. या कार्यशाळेत परुळेबाजार ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीचे उपक्रम
परुळेबाजार ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. यामध्ये काथ्या व्यवसायातून २५० ते ३०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुकास्तरीय प्लास्टिक युनिट महिला बचतगटामार्फत चालविले जात असून, पाणीपुरवठा व्यवस्थापन, पाणीपट्टी वसुली, गांडुळखत निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन युनिट, पायपुसणी मशीनद्वारे रोजगारनिर्मिती असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
महिलांच्या सुरक्षिततेसाठी परुळेबाजार ग्रामपंचायतीने विशेष उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांचे फलक व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अॅनिमियामुक्त गाव उपक्रमांतर्गत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृतीही केली जात आहे.
आदर्श ग्रामपंचायत म्हणून परुळेबाजार
परुळेबाजार ग्रामपंचायत राज्य व देशपातळीवर आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
konkansamwad 
