१५ दिवसात मागण्या पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.....माजी खासदार विनायक राऊत यांचा बीएसएनएल अधिकाऱ्यांना इशारा
सावंतवाडी
चांगली सेवा दिला नाहीत तरी चालेल परंतु बीएसएनएलच्या सेवेवर गेली अनेक वर्षे अवलंबून असलेल्या ग्राहकांची फसवणूक करू नका. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करा, खोटी आश्वासने देऊ नका, असा दम माजी खासदार तथा ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान जिल्ह्यातील बीएसएनएलच्या समस्या दूर करण्यासाठी येत्या १५ दिवसात योग्य तो प्रयत्न करा, अन्यथा त्यानंतर आम्ही शिवसेना म्हणून उग्र आंदोलन करू, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यात बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी राऊत यांनी बीएसएनएलचे अधिकारी जुन्नू यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील अनेक टॉवरची माहिती घेतली. यात 4G चे काम सुरू असल्यामुळे तसेच काही ठिकाणी बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे बीएसएनएलच्या सेवा देण्यास अडचणी येत असल्याचा दावा जुन्नू यांनी केला.यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. खाजगी कंपन्यांना या ठिकाणी वाव मिळवून देण्यासाठी बीएसएनएलचे अधिकारी काम करत आहे. त्यांच्याकडून हप्ते मिळत असल्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा दिली जात नाहीत, असा आरोप यावेळी अधिकाऱ्यांवर करण्यात आले. तसेच वारंवार लक्ष वेधून सुद्धा बीएसएनएल अधिकारी चांगली सेवा देत नाहीत. आमच्याकडे सामान नाही, त्यामुळे आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे, अशी कारणे दाखवून या सेवेकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे बीएसएनएल वर अवलंबून असलेले अनेक ग्राहक अन्य कंपन्यांकडे वळत आहेत. त्याला सर्वस्वी बीएसएनएलचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे यांची चौकशी करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राऊत यांनी विधानसभा मतदारसंघात गावानुसार या ठिकाणी आढावा घेतला तसेच ज्या ठिकाणी बीएसएनएलच्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येत्या १५ दिवसात प्रयत्न करण्यात यावेत, किरकोळ समस्या असल्याच्या तात्काळ दूर करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच सिंधुदुर्गात अनेक ग्राहक या ठिकाणी बीएसएनएल वापरत आहेत. अन्य मोबाईल कंपनीच्या तुलनेत या ठिकाणी बीएसएनएलचे वापरकर्ते जास्त आहेत. त्यामुळे त्यांना चांगली सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करा. लोकांचा अंत पाहू नका, अशा सूचना यावेळी राऊत यांनी केल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून बीएसएनएल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वारंवार मागणी करून सुद्धा व लक्ष वेधून सुद्धा पीएसआय अधिकारी दाद देत नाहीत, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यावेळी येत्या १५ दिवसात मागण्या पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू आणि त्यावेळी होणाऱ्या परिणामांना अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

konkansamwad 
